तुम्हाला मुलगी असल्यास ह्या १२ गोष्टी लक्षात ठेवा
Published On June 20, 2017 By ZenParent at zenparent.in

मुलीला वाढवणं हे एका मुलाला वाढवण्याहून पूर्णपणे वेगळं असतं, पण वाईट अर्थाने नाही. जर तुम्ही लहानग्या मुलीला वाढवत असाल, तर ह्या १२ गोष्टी तुम्ही नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.
इथून निवडले आहे: फॅमिली शेअर
१. तुमचं मेकअपचं साहित्य हे आता तिचं आहे
माझ्या मुलीला तिचा स्वतःचा कायापालट करून घेणं खरंच आवडतं. कालांतराने मेकअपचा कमीत कमी वापर करणं तिला शिकवलं पाहिजे पण सध्या, मेकअप फक्त गंमत म्हणून करायचा.
२. तिला मासिक पाळीबद्दल सांगताना खूप अवघडल्यासारखं आणि कसंसच वाटतं, पण जेव्हा तिची पाळी येईल तेव्हा ती त्यासाठी तयार असली पाहिजे.
माझ्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल बोलण्यात एक खुलेपणा आणण्याचं कर्तव्य माझं आहे. अशा गोष्टींबद्दल तिला कुणाशीतरी मोकळेपणाने बोलता यायला हवं आणि ती व्यक्ती मी असायला हवी.
३. बाहेरचं जग तिला खूप भरभर मोठं व्हायला भाग पाडील आणि तिची निरागसता, लहानपण शक्य तितक्या वेळ जपणं हे तुमचं काम आहे.
म्हणूनच माझ्या मुलीला जरी हे आवडत नसलं तरी बाहेर जाताना तिच्यासाठी मेकअप नाही, फक्त साजेसे कपडे, आणि एवढ्यात सेलफोन सुद्धा नाही. मर्यादा आखून देणं हे माझं कर्तव्य आहे.
४. तिच्या वडिलांसोबतच्या नात्याला प्रोत्साहन आणि पाठिंबा द्या
तुमच्या मुलीला तुमची आई म्हणून गरज असते पण तिला हे कळलं पाहिजे की तिच्या वडिलांचं तिच्यावर प्रेम आहे जेणेकरून कुठल्या मुलाच्या प्रेमाच्या ढोंगाला ती बळी पडणार नाही.
५. तिला बचतीचं मोल समजावून सांगा जेणेकरून तिला पुढे कधी आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
६. आपल्या शरीराबद्दल तुम्ही तिच्यासमोर कसं बोलता याबद्दल दक्ष राहा
स्त्रियांनी आपल्या शरीराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं ह्याचं उदाहरण म्हणून ती तुमच्याकडे पाहील. तिच्यासमोर स्वतःबद्दल बोलताना सहृदयतेने बोला. माझ्या मुलीसमोर बोलताना मी, शरीरावरून चिडवणं किंवा शारीरिक वजनाबद्दल नकारात्मक बोलणं शक्य तितकं टाळण्याचा प्रयत्न करते. वयाच्या ८व्या वर्षीही तिला बॉडी साईझ ह्या गोष्टीची जाण आहे आणि त्याबद्दल तिला चिंताही वाटते. मी तिला दिलासा देते की तिची बॉडी साईझ योग्य आणि हेल्दी आहे.
७. तिला जपा पण तिला स्वतःचं रक्षण स्वतः करायलाही शिकवा
दुनियेला अधिकाधिक कणखर स्त्रियांची गरज आहे. माझ्या मुलीला माहितीय की मी तिच्या पाठीशी आहे पण तिने माझ्याकडे मदतीसाठी येण्याआधी कुठल्याही अडचणीवर मात करण्याचा काहीवेळा तरी प्रयत्न केला पाहिजे.
८. तिचं सौंदर्य आणि तिचं रंगरूप ह्याव्यतिरिक्त तिच्या इतर गोष्टींचीही प्रशंसा करा
तिला हे कळलं पाहिजे की तिच्या स्वत्त्वाची किंमत तिच्या सौंदर्याहून अधिक आहे. ती हुशार, विनोदी किंवा दयाळू आहे हे तिला सांगा. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या काळासोबत फिक्या पडत नाहीत.
९. लोकं तुम्हाला कसं वागवतात ह्याबद्दल काही मर्यादा निश्चित करा
आपण तिचे सगळ्यात मोठे शिक्षक असतो आणि आपण काय बोलतो ह्यापेक्षा आपण काय करतो ह्यातून ती जास्त शिकत असते. म्हणून तुम्ही जर कणखर असाल आणि योग्य वागणुकीचा आग्रह धरत असाल, तर तुमची मुलगी सुद्धा मोठी होऊन तुमच्याच पावलावर पाऊल ठेवेल.
१०. तुमच्या स्वप्नांचा आणि आवडींचा पाठपुरावा करा
आपल्याला काय करायला आवडतं हे महत्त्वाचं असतं, हे तिला स्वतःच्या उदाहरणाद्वारे पटवून द्या जेणेकरून तिला तिची स्वतःची स्वप्न आणि आवडी महत्त्वाच्या वाटतील. म्हणूनच मी माझ्या मुलीला माझ्या ब्लॉगिंगच्या संदर्भातली ध्येय आणि कामगिरी सांगते जेणेकरून तिला कळेल की माझी काही ध्येय आहेत. आणि मला ज्याचा अभिमान आहे असं माझं कर्तृत्वही तिला दिसेल.
११. पुरुषांच्या आणि मुलग्यांच्या सभोवताली असताना तिला हुशारीने वागायला शिकवा
आपल्या अंतःप्रेरणांवर आणि अंतस्थ भावनांवर विश्वास ठेवायला शिकणं महत्त्वाचं आहे.
१२. तिला हे समजावून द्या की तिच्या शरीराची कदर केली गेली पाहिजे आणि त्याकडे आदराने बघितलं गेलं पाहिजे
तिच्याशी नात्यांबद्दल मनमोकळा आणि प्रामाणिक संवाद साधा आणि तिला कसं वागवलं जायला हवं किंवा कसं वागवलं जाता कामा नये, हे तिला समजावून सांगा.
Translated by Anyokti Wadekar
No comments:
Post a Comment